नवी दिल्ली - भारतीय व्हॉटस अॅप युजर्सच्या गोपनीयतेचा भंग केलेल्या आरोपांना कंपनीने उत्तर दिले आहे. युजर्सच्या संदेशांची गुप्तता आणि सुरक्षा ही आमची सर्वांत मोठी प्राथमिकता असल्याचे कंपनीने म्हटले आहे. इस्रायली सॉफ्टवेअर पेगाससचा वापर करून भारतीय युजर्सच्या संदेशांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप कंपनीवर होत आहे.
याविषयी व्हॉटस अॅपकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. 'युजर्सची गुप्तता आणि सुरक्षा ही आमची सर्वांत मोठी प्राथमिकता आहे. मे महिन्यात आम्ही तातडीने सुरक्षेची समस्या सोडवली आणि संबंधित भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सरकारी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. आम्ही एनएसओ ग्रुप या हेरगिरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीला जबाबदार धरावे, असे न्यायालयाला सांगितले होते. यासाठी आम्ही ज्या युजर्सना लक्ष्य करण्यात आले होते, ते कोण आहेत याची माहितीही घेतली होती,' असे व्हॉटस अॅपने म्हटले आहे. 'आम्ही भारत सरकारसह एकत्र येऊन युजर्सना हॅकर्सपासून संरक्षण देण्यात एकमत केले आहे. युजर्सच्या संदेशांना सुरक्षा देण्याबाबत कंपनी कटिबद्ध आहे,' असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
हेही वाचा - २०५० मध्ये मुंबई बुडणार! वाचवायची असेल तर भुयारी मेट्रोचे काम थांबवा - गिरीष राऊत
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नागरिकांच्या संदेशांच्या गोपनीयतेचा भंग झाल्याप्रकरणी सरकार लक्ष ठेवून असल्याचे म्हटले होते. तसेच, सरकारने व्हॉटस अॅपकरून याविषयीचे स्पष्टीकरण मागवले असल्याचे ते म्हणाले होते. याविषयी त्यांनी ट्विट केले होते.
हेही वाचा - झारखंड विधानसभा: ५ टप्प्यांत निवडणूक घेण्याचा निर्णय दुर्देवी - काँग्रेस