नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी निवडणुकी आधी आघाडी केल्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप जागा वाटप झाली नाही. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत जागावाटप होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
जागा वाटपाच्या मुद्द्यावर आज चौथी बैठक
डाव्या पक्षांशी जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी बंगाल काँग्रेसने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या डाव्या पक्षांसोबत कोलकात्यात तीन बैठका झाल्या आहेत. आज या चर्चेतील चौथी बैठक होणार आहे. ऑल इंडीया काँग्रेस कमिटीचे प्रमुख जीतिन प्रसाद यांनी सांगितले की, आम्ही स्थापन केलेली समिती डाव्या पक्षांशी चर्चा करण्यास सक्षम आहे. पक्षाचे आणि राज्याचे हित डोळ्यापुढे ठेवून जागा वाटप करण्यात येणार आहे. जागा वाटप करताना आम्ही उमेदवारांची गुणवत्ता आणि संख्या दोन्हींचाही विचार करणार आहोत.
डाव्या पक्षांची जागा वाटप करताना ताठर भूमिका -
२०१६ साली बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९२ जागा लढवल्या होत्या. त्यातील ४४ जागा जिंकल्या होत्या. तर डाव्या पक्षांनी २०२ जागा लढवल्या होत्या त्यापैकी ३२ जागांवर विजय मिळवला होता. जागा वाटपाबाबत डाव्या पक्षांची भूमिका ताठर असल्याचे काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितले. दरम्यान बंगालची सत्ता मिळवण्यासाठी भाजपाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये मुख्य लढत होणार आहे.