ओडिशा - देशभरात प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातल्यानंतर आता त्याला पर्यायी घटक शोधण्यात येत आहेत. यासाठी विविध ठिकाणी कापडी पिशव्या तसेच अन्य पर्यायांचा वापर होत असतो.
परंतु, संबळपूर जिल्ह्यात प्लास्टिकच्या प्लेट्सऐवजी पळसाच्या(Sal leaves) पानांपासून बनवलेले द्रोण तयार करण्याचा उपक्रम प्रशासनातर्फे राबवण्यात आला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने रेंगाली वनपरिक्षेत्रात प्रक्रिया प्रकल्पाची स्थापना केली आहे. स्थानिक महिलांच्य मदतीने या प्रकल्पात पानांवर प्रक्रिया करुन त्यापासून पत्रावळ्या तयार करण्यात येतात. हा लघुद्योग ग्रामीण महिलांसाठी एक प्रकारे वरदानचं ठरलं आहे. वाढत्या प्लास्टिकच्या मागणीवर हा उत्तम पर्याय असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
गुमई गावातील या उपक्रमामुळे गावातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी प्रशासनाने या उपक्रमाला पाठबळ दिले आहे. जिल्हा प्रशासन, राज्य वनविभाग, राज्य ग्रामविकास व मार्केटींग सो. तसेच ओडिशा लाईव्हलीहूड मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
टिकाऊ पत्रावळ्या बनवण्यासाठी पारंपारिक पद्धतींपेक्षा आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येतो. यामुळे महिलांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. आधी दिवसभरात 100 पत्रावळ्या करण्याची क्षमता आता थेट 500 पर्यंत गेली आहे. तसेच आधी 70 पैसे किंमत मिळत होती. आता प्रत्येक प्लेट 3.50 पैसे किंमत मिळत असल्याने उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे. शासनाच्या या उपक्रमात फक्त प्लास्टीकच्या वापराविरोधात जागरुकता निर्माण करणे हा हेतू नसून महिलांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्यावरही भर दिला आहे.
वनपरिक्षेत्रातील पळशीची झाडे असलेल्या भागात या महिलांना मोफत संचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सकाळी झाडांची पाने गोळा करुन या महिला वनविभागाच्या प्रशिक्षण केंद्रात येऊन पुढील प्रक्रिया पार पाडतात. यामध्ये पाने वाळवण्यापासून ते शिवण्यापर्यंत कामे समाविष्ट आहेत.
सध्या या प्लेट्सची मागणी वाढत असून बाजारातील अन्य पारंपारिक प्लेट्सपेक्षा त्यांना जास्त किंमत मिळत आहे. या पत्रावळ्या गोव्यासहित रायपूर, भोपाळ तसेच कोलकात्याला विक्रीसाठी पाठवण्यात येत असल्याची माहिती प्रकल्प संचालक सुकांता त्रिपाठी यांनी दिली आहे. तसेच या उपक्रमासाठी सीएसआर मार्फत अधिक निधीची पूर्तता होण्यासंबंधी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.