हैदराबाद - विशाखापट्टनम येथील एल. जी पॉरिमर कंपनीत मागील आठवड्यात गॅस गळती झाली. या दुर्घटनेत हजारो टन गॅस वातावरणात पसरला गेला. याप्रकरणी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने एल. जी पॉरिमर कंपनींचा संपूर्ण परिसर ताब्यात घेण्याचे निर्देश दिेले आहेत. कंपनी पूर्णपणे ताब्यात घेतली जाईल आणि कंपनीच्या संचालकांसह कोणालाही आवारात प्रवेश घेता येणार नाही, असे न्यायालायने म्हटले आहे.
सरन्यायाधीश जिंतेंद्र कुमार माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ललिता कन्नेगंती यांच्या खंडपीठानेही यावर निर्णय दिला आहे. तसेच कोणत्याही समितीला परिसराची पाहणी करण्याचे स्वातंत्र्य असेल, परंतु कंपनीच्या मुख्य द्वारावर असलेल्या रजिस्टरवर तपासणीसंदर्भात माहिती लिहावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने तीन याचिकांवर सुनावणी करताना शुक्रवारी अंतरिम आदेश दिला. मात्र, रविवारी लेखी आदेश जारी करण्यात आला आहे.
दरम्यान एल. जी पॉरिमर कंपनीत गॅस गळती झाली. या दुर्घटनेत हजारो टन गॅस वातावरणात पसरला गेला. या दुर्घटनेत कारखान्याशेजारच्या गावांमधील ११ जणांचा मृत्यू झाला, तर एक हजारापेक्षा जास्त नागरिक विषारी गॅसमुळे बेशुद्ध पडले. स्टायरीन वायू मानवासाठी धोकादायक असून त्याचे परिसरात दुरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील एक वर्ष या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा, असे केंद्र सरकारने आंध्रप्रदेश सरकारला सांगितले आहे.