बाघपथ (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये तरुणीचा सामूहिक बलात्कारानंतर खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेविरोधात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहेत. उत्तर प्रदेशच्या बाघपथ येथील निरपुडा गावातील सरपंच मुनेश देवी यादेखील आरोपींच्या कठोर शिक्षेच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत.
![निरपुडा गावच्या सरपंच मुनेश देवी यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना लिहिलेले पत्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/up-bag-01-ann-tyag-avb-10082-avb_04102020094713_0410f_1601785033_207.jpg)
हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासनाविरोधात राज्यासह संपूर्ण देशात आंदोलन होत आहे. उत्तर प्रदेशच्या बाघपथ जिल्ह्यातील निरपुडा गावच्या सरपंच मुनेश देवी यांनी या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी त्यांनी शनिवार सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
तसेच, त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. शनिवारी कोलकाता येथे हाथरस सामूहिक बलात्काराच्या विरोधात डाव्या आणि काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.
हाथरसमध्ये १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय दलित तरुणीवर चार तरुणांनी बलात्कार करुन, तिची जीभ कापली आणि मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला. या अत्याचारानंतर तरुणी बेशुद्ध झाली. ती मृत झाली आहे, असे समजून चौघे आरोपी तिला तसेच टाकून निघून गेले. पीडित तरुणीवर दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी पीडित तरुणीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.