हैदराबाद - केवळ भौगोलिक सीमा असणे म्हणजे राष्ट्र होत नाही. राष्ट्रवादी भावनेतून कल्याण होत असलेला भाग म्हणजे राष्ट्र होतो, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. आपल्याला अनेक मुल्यांनी समृद्ध असलेली संस्कृती लाभलेली आहे. संकट काळात एकमेकांना आधार देण्याचे आपली संस्कृती शिकवते, असेही ते म्हणाले.
हैदराबादमधील एमसीआर एचआरडी इन्स्टिट्युटमध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
'वसुधैव कुटुंबकम्' या उक्तीचे पालन आपल्या पूर्वजांनी केले. आताही आपल्या देशात त्याचे पालन केले जाते. फक्त 'जय हिंद' च्या घोषणा दिल्याने, जण-गण-मन आणि वंदे मातरम् गायल्याने आपला राष्ट्रवाद सिद्ध होत नाही. देशातील प्रत्येक व्यक्तीला अन्न मिळवून देणे, त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करता येणे, म्हणजे खरा राष्ट्रवाद आहे, असे नायडू म्हणाले.
त्यापूर्वी नायडू यांनी ट्विटकरूनही नेताजी बोस यांना अभिवाद केले. एखादी व्यक्ती मरण पावते, मात्र त्या व्यक्तीचे विचार जिवंत राहतात. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याचे विचार हजारोजणांना प्रेरणा देत राहतात.' असे ट्विटमध्ये नायडू यांनी म्हटले आहे.