नवी दिल्ली - सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या वसुंधराराजे आणि दुष्यंत सिंह यांना कोरोनाची लागण नसल्याचे समोर आले. दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले असून वसुंधराराजे, दुष्यंत सिंह आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 96 खासदारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार. माझ्या प्रती लोकांचे असलेले प्रेम हीच माझी संपत्ती आहे. माझी आणि दुष्यंतची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. खबरदारी म्हणून आम्ही येते 15 दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहोत, असे टि्वट वसुंधरा यांनी केले आहे.

16 मार्चला दुष्यंत सिंह यांचा कनिका कपूरशी संपर्क आला होता. त्याच्या 2 दिवसानंतर म्हणजेच 18 मार्चला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या खासदारांना अल्पोपहारासाठी आमंत्रण दिले होते. कार्यक्रमात 96 खासदारांनी उपस्थिती लावली होती. दुष्यंत सिंह हे कनिका कपूरच्या संपर्कात आल्याचे कळल्यानंतर 96 खासदारांमध्ये खळबळ उडाली होती. काही खासदारांनी सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. दुष्यंत सिंह यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटेकाचा श्वास सोडला आहे.
बेबी डॉल' गाण्याची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तिला लखनऊ येथील केजीएमयू रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. १५ मार्च रोजी ती लंडनहून भारतात परतली होती. भारतात येण्यापूर्वी ती लंडन येथे काही पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर ती लखनऊ येथील एका पार्टीमध्ये सहभागी झाली होती. त्या पार्टीमध्ये वसुंधराराजे आणि दुष्यंत सिंह यांचा कनिकाशी संपर्क आला होता. कनिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.