नवी दिल्ली - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे भारतात रुग्ण आढळून आल्याने 22 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे अनेक नागरिक भारताबाहेर अडकले होते. अशा नागरिकाना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत विमानाच्या माध्यमातून भारताबाहेरील नागरिकांना मायदेशी आणले जात आहे. यासाठी एअर इंडियाने 4 ते 6 जून दरम्यान अतिरिक्त फ्लाइट्सची व्यवस्था करणार असल्याचे जाहीर केली.
अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि स्विडनमधून भारतीयांना मायदेशी परत आणण्यात येईल. मिशन वंदे भारत अंतर्गत ही उड्डाने जाहीर करण्यात आली आहेत. 4 जूनला दिल्ली ते ऑकलँड, 5 जूनला दिल्ली ते शिकागो आणि स्टॉकहोम, 6 जूनला दिल्ली ते न्यूयॉर्क, फ्रँकफर्ट आणि सेऊल, 6 जूनला मुंबई ते लंडन आणि न्यूयॉर्क, अशी अतिरक्त उड्डाने घेतली जाणार असल्याचे नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले.
30 मे रोजी सकाळी 11 वाजण्यापासून उड्डाणांचे बुकिंग सुरू होईल. परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्राने 7 मे रोजी वंदे भारत मिशन सुरू केले होते. पहिल्या टप्प्यामध्ये 7 ते 16 मे दरम्यान 16,000 पेक्षा जास्त भारतीयांना परत आणले गेले. दुसर्या टप्प्यात 17 मे ते 13 जून या कालावधीत एअर इंडियाची 60 देशांत विमाने जाणार आहेत.