नवी दिल्ली - कोविड१९ आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊल उचलले असून लसीकरणाची तारीख जाहीर केली आहे. 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरण मोहीम सुरू होईल, अशी घोषणा सरकारने आज (शनिवार, ९ जाने.) केली.
उच्चस्तरिय बैठकीनंतर घोषणा
कोविड लसीकरणासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सज्जतेसह देशातील कोविड १९च्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आगामी सण लक्षात घेता निर्णय
सविस्तर आढावा घेतल्यानंतर, लोहरी, मकरसंक्रांती, पोंगल, माघ बिहू, इत्यादींसह आगामी उत्सव लक्षात घेता कोविड१९ लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. आपत्कालीन उपयोगाकरिता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लसींना मंजुरी मिळाली आहे. डीसीजीआयने तीन जानेवारीला कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशील्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली होती.
'यांना' प्राथमिकता
आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी, ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना या लसीत प्राथमिकता देण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना या लसीकरणासाठी नावनोंदणी करावी लागणार आहे. मात्र, वैद्यकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना अशी नोंदणी करावी लागणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, आतापर्यंत २ लाख २४ हजार १९० अॅक्टिव्ह केसेस आहेत. पुढील आठवड्यात लसीकरण सुरू होणार असल्याचे संकेत नुकतेच आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिले होते.
देशात सुमारे ४० लस-साठवण केंद्रे
देशात सध्या कोरोना लस साठवून ठेवण्यासाठी चार प्रमुख केंद्रे आहेत. या केंद्रांना जीएमएसडी म्हटले जाते. कर्नाळ, मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये ही केंद्रे आहेत. यासोबतच देशभरात अशी ३७ लहान केंद्रे आहेत. लसींना विशिष्ट तापमानात ठेवावे लागते. अशा प्रकारची केंद्रे आपल्याकडे गेल्या दशकभरापासून देशात उपलब्ध आहेत.