डेहराडून - उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनाबाधित पर्यटन मंत्र्याच्या संपर्कात आल्याने रावत यांनी स्वत: ला क्वारंटाईन केले होते. आज(शुक्रवार) त्यांचा अहवाल आला असून कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागच्या आठवड्यात राज्याचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज त्यांची पत्नी आणि कुटुंबातील पाच सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. 29 मे ला राज्याची कॅबिनेट बैठक झाली होती. त्या बैठकीला सतपाल महाराज यांनीही हजेरी लावली होती. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मुख्यमंत्री रावत यांच्यासह तीन कॅबिनेट मंत्री विलगीकरणात होते.
बैठकीला हजर असलेले अधिकारी आणि इतर मंत्र्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता खुप कमी आहे, त्यामुळे त्यांनी विलगीकरणात राहण्याची गरज नाही, असे आरोग्य सचिव अमित नेगी यांनी स्पष्ट केले होते. मात्र, तरीही मुख्यमंत्र्यासह तीनही मंत्र्यांनी स्वत:चे विलगीकरण करून घेतले होते.