शहाजहाँपूर-कोरोनाच्या भीतीमुळे 60 वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याची घटना उत्तर प्रदेशातील शहाजहाँपूरमध्ये समोर आली आहे. या व्यक्तीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला तीन तास बेवारस स्थितीत होता, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
मृत व्यक्तीचे नाव लियाकत असे असून तो मुंबईमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम करत होता. काहीच दिवसांपूर्वी तो मुंबईवरून शहाजहाँपूर येथील तिल्हार मध्ये परतला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लियाकत मंगळवारी त्याच्या भाचीला भेटण्यासाठी जात होता. मात्र रस्त्यामध्ये लियाकत यांना श्वास घेताना त्रास सुरू झाला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
जनतेमध्ये कोरोना विषाणू संसर्गा बद्दल भीती असल्यामुळे कोणत्याही नागरिकांनी लियाकत यांच्या मृतदेहाजवळ जाण्याचे धाडस केले नाही. मंगळवारी सायंकाळी रस्त्याच्या कडेला बेवारस स्थितीत असलेल्या मृतदेहाची माहिती मिळाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
मृत व्यक्तीच्या खिशामध्ये मुंबईहून प्रवास करून आल्याचे तिकीट सापडले. मुंबईवरून आल्यामुळे त्या व्यक्तीला कोरोना झाल्याचा संशय असल्यामुळे कोरोना मार्गदर्शक तत्वानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि तो परिसर मार्गदर्शक तत्वानुसार स्वच्छ करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.