श्रीनगर - अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कृषी उत्पादकता वाढण्यासोबत शेतकऱ्यांचेही उत्पन्न दुप्पट होईल, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शनिवारी केले.
शेर-ए-काश्मीर कृषिविज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, काश्मीर येथे मुलींचे वसतिगृह आणि प्रयोगशाळेच्या इमारतीच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. यावेळी मलिक यांनी विद्यापीठाच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. तसेच संस्थेच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल कुलगुरु नाझीर अहमद, त्यांचे सहकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
यावेळी विद्यापीठाचे कर्मचारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज्यपालांनी कृषी क्षेत्रातील संशोधनाचे महत्त्व हे विषय अधोरेखित केले. तसेच कृषी क्षेत्राचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करणे, हा एकमात्र उपाय असल्याचे सांगितले.
कृषी विद्यापीठांच्या प्रायोगिक भूखंडांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि तंत्रे हे शेतकर्यांच्या शेतातही तंतोतंतपणे अंमलात आणावे. यामुळे दोन भूखंडामध्ये दिसून येणारा फरक कमी असेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच कृषी शास्त्रज्ञांनी विशेष करून उत्पादन सुधारण्यासाठी, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि त्यांचे योग्य विपणन यासंदर्भात संशोधन करण्याकडे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.