बुलंदशहर - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात निषेध आंदोलन दिल्ली परिसरात धडक देत आहे. यावर उत्तर प्रदेशचे वने आणि पर्यावरण मंत्री अनिल शर्मा यांनी टीका केली आहे. आंदोलन करणारे शेतकरी नसून ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. शेतकरी तर आपल्या कामात मग्न आहेत. काही लोक जमा होऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही शर्मा म्हणाले.
ही निदर्शने व निषेध आंदोलने सर्वसामान्य शेतकरी करत नाहीत. सामान्य शेतकर्याला आपल्या रोजच्या कामातून व्यर्थ कामे करण्यास वेळ मिळत नाही. माझा विश्वास आहे की, कोणत्याही शेतकऱ्याने आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला नाही. हे काम करणारे काही गुंड लोक आहेत.
शेतकऱ्यांच्या हितासाठी काम
उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे. शेतकर्यांच्या ऊसाला वेळेवर बील अदा करणे, गहू, तांदूळ वेळेवर मोठ्या प्रमाणात खरेदी करणे, ही कामे सरकार प्राधान्याने करत आहे. साखर कारखाने वेळेवर सुरू आहेत. यावेळी सरकारने मकादेखील खरेदी केला आहे. यापूर्वी राज्यात कोणत्याही सरकारने मका खरेदी केला नव्हता. उत्तर प्रदेश सरकार सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे, असेही शर्मा म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली नंतर पंजाब आणि हरियाणामध्ये आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांना भारतीय किसान युनियनकडूनही पाठिंबा मिळाला आहे.