लखनऊ - सध्या देशात संचारबंदी सुरू आहे. यामुळे गरीब तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची उपासमारी होत आहे. त्यांच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी उत्तरप्रदेश सरकारने मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुरवठा आजपासून (1 एप्रिल) केला जाणार आहे. ज्या लोकांना रास्त धान्य दुकानाला जाणे शक्य नाही, अशांना दुकानदारांनी घरपोच साहित्य पुरवाले जाणार आहे.
अन्न व पुरवठा विभागाने याबाबत आदेश काढले आहेत. मोफत अन्न पुरवठा योजनेचा लाभ सध्या अत्योंदयधारक, नरेगा मजूर त्याचबरोबर नोंदणीकृत रोजंदारी मजुरांना मिळणार आहे. तर 15 एप्रिलपासून सर्व शिधा पत्रधारकांना 5 किलो प्रती व्यक्ती मोफत तांदूळ दिला जाणार आहे.
या धान्य वाटपावेळी सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे असून हात धुण्यासाठी साबण, पाणी किंवा सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना रास्त धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाने मजुरांच्या खात्यामध्ये प्रत्येकी एक हजाराची रक्कम वर्ग केली आहे. आता धान्य मोफत देण्याचाही निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - लॉकडाऊन : बंगळुरू पोलिसांकडून गरीबांच्या भोजणाची सोय, स्वतः जेवण बनवून केले वाटप