नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे राज्यातील शेतकरी, मजूर आणि लघु उद्योगांना फटका बसला आहे. त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी विनंती कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्राद्वारे केली आहे.
प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना पत्र लिहले आहे. यामध्ये शेतकऱयांना पीक कापणीस मदत करण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनांची खरेदी सुनिश्चित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. कोरोनामुळे अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरावरचे समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्याकडे त्वरित लक्ष देऊन जनतेला मोठा दिलासा द्यावा, असेही प्रियांका यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
प्रदेशातील शेतकऱ्यांना गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यासाठी सरकारनेही नुकसान भरपाई जाहीर केली होती, परंतु अद्याप शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. ही भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्रामध्ये केली आहे.
यापूर्वीही प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्राद्वारे कोरोना तपासणी केंद्र वाढवण्याची मागणी केली होती. कोरोना चाचणी करणाऱ्या लॅबची संख्या तुलनेने कमी आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या 23 कोटी इतकी आहे. मात्र, कोरोना तपासणी केंद्रांची संख्या फक्त 7000 इतकीच आहे. कोरोना तपासणी केंद्रासोबतच सॅनिटायझर्स आणि मास्कचा साठा देखील वाढवण्यात यावा, असे त्यांनी आपल्या पत्रातून म्हटले होते.