नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला आमदार कुलदीप सिंह सेंगरची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पीडितेच्या कारला झालेल्या अपघातानंतर घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत होता. भाजपवरही कुलदीप सेंगरवर कारवाई करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता.
देशभर गाजलेल्या उन्नाव बलात्कार घटनेतील पीडिता आणि तिचे कुटुंब रायबरेली येथील कारागृहात बंद असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २३२ वर गुरबख्श गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कारला भरधाव ट्रकने धडक दिली. या कारमधून पीडिता, काकू, मावशी आणि या प्रकरणात पीडितेची बाजू मांडणारा वकील असे ४ जण प्रवास करत होते. अपघातात पीडितेची काकू आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. यापैकी पीडितेची काकू ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. तर, वकिलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. पीडितेची स्थिती धोक्याबाहेर आहे. तर, वकील अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. पीडितेच्या आईने हा अपघात आपल्या मुलीला ठार करण्यासाठीच घडवून आणल्याचा आरोप केला आहे. कुलदीप सेंगर सध्या तुरुंगात असून तो तेथूनच आपल्या आणि आपल्या मुलीभोवती हे संपूर्ण कारस्थान रचत असल्याचे पीडितेच्या आईने म्हटले आहे.
अपघाताप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर, त्याचा भाऊ मनोज सिंह सेंगर आणि इतर ८ जणांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे.