उन्नाव - उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला. तिला ५ जणांनी रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिले होते. यात ती ९० टक्के भाजली होती. तिचा २ दिवसांनी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हैदराबाद बलात्कार घटनेनंतर एका आठवड्याच्या आत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे.
उन्नाव येथे पीडितेच्या वडिलांशी ईटीव्ही भारतने संवाद साधला. पीडितेच्या वडिलांनी गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. पीडितेच्या वडिलांनी अत्यंत उद्विग्न होऊन सरकार आणि न्याय पालिकेवर विश्वास राहिला नसल्याचे म्हटले आहे. सरकार आणि न्याय पालिकेने वेळीच योग्य पावले उचलली असती, तर आज माझी मुलगी जिवंत असती, असे पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे. एक तर या गुन्हेगारांना तत्काळ फाशी मिळावी किंवा त्यांचे हैदराबादसारखे एन्काऊंटर करण्यात यावे, असे पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे.
'न्यायपालिकेच्या प्रक्रियेतून न्याय मिळण्यास प्रचंड विलंब लागतो. माझे वय झाले आहे. न्यायपालिकेकडे न्याय मागता-मागता आम्हीही या जगातून निघून जाऊ. तसेच, आमच्यावरही हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर माझ्या मुलीसाठी न्याय कोण मागणार?' असा हृदय पिळवटून टाकणारा प्रश्न पीडितेच्या वडिलांनी विचारला आहे.
'न्यायपालिकेद्वारे न्याय मिळवणे हे श्रीमंतांचे काम आहे. आम्ही गरीब लोक आहोत. खटला लढण्यासाठी आमच्याकडे पैसाही नाही. अशा स्थितीत आम्हाला न्याय मिळण्याची काय शाश्वती आहे,' असा सवाल करत त्यांनी न्यायपालिकेवर विश्वास राहिला नसल्याचे म्हटले आहे.