बंगळुरू - केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुस्लीम वडील आणि आई ख्रिश्चन असलेल्या राहुल यांच्याकडे हिंदू असण्याचा काही पुरावा आहे का? असे हेगडे यांनी म्हटले आहे. स्वत:ला जानवेधारी हिंदू म्हणवून घेणाऱ्या राहुल यांच्याकडे हिंदू असण्याचा पुरावा आहे का, असे हेगडे यांनी म्हटले आहे. कर्नाटकमधील सिरसी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत संपूर्ण जगाला खात्री आहे. तरीही राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील लोक त्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, असेही हेगडे म्हणाले. जेव्हा राजीव गांधी मरण पावले तेव्हा तेथे त्यांच्या शरीराचा काही भाग होता. या शरीराच्या भागाची डीएनए चाचणी करण्यात आली. यावेळी प्रियंका गांधीचे सॅम्पल घ्या पण राहुलचे नको, असे सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. हे सर्व 'ऑन रेकॉर्ड' आहे. तर हे हायब्रिड व्यक्तिमत्त्व पुरावा मागत आहे. अशाप्रकारचे लोक काँग्रेसमध्ये असताना लोक यांना जिंकून देण्याचा प्रश्नच उभा राहत नाही, असेही हेगडे म्हणाले.
भाजप पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन करेल असा दावाही हेगडे यांनी केला. हेगडे यांनी यापूर्वीही अनेकदा राहुल यांच्यावर याप्रकारे टीका केलेली आहे. राहुल यांना हिंदू धर्मातील काहीच कळत नाही. वडील मुस्लीम आणि आई ख्रिश्चन असलेला व्यक्ती ब्राह्मण कसा असू शकतो, असे हेगडे म्हणाले होते. राहुल यांचे डोके रिकामे आहे. त्यांना या गोष्टी समजत नाहीत. जगभरातील कुठल्याच लेबॉरेटरीमध्ये तुम्हाला राहुलसारखा हायब्रिड माणूस सापडणार नाही, असेही हेगडे म्हणाले होते. राहुल फेक हिंदू आहेत, असेही हेगडे म्हणालेले आहेत.