न्यूयॉर्क - कोरोना संकट काळात 120 कोटी विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले आहेत, असे युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफने म्हटले आहे. तंत्रज्ञानाच्या वापरातील असमानतेमुळे जागतिक स्तरावर शिक्षणाचे संकट उभे राहील, असा इशारा युनिसेफने दिला आहे.
शाळा बंद असताना घरातून शिक्षण घेण्यासाठी तंत्रज्ञान आणि त्यासाठीची संसाधनांमध्ये मोठ्या प्रमानात असमानता दिसून येत आहे, असे युनिसेफच्या शिक्षण विभागाचे प्रमुख रॉबर्ट जेनकिंन्स यांना सांगितले. घरातून शिक्षण घेण्यासाठी ज्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही, ते शिक्षण घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
घरातून शिक्षण घेण्यासाठी उपकरणांचा पुरवठा आणि प्रत्येक शाळेला आणि विद्यार्थ्याच्या घरी इंटरनेट उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कोरोनाचा फैलाव होण्याच्या आधीपासून शिक्षणक्षेत्र संकटात आहे. त्यात आता कोरोनाच्या प्रसारामुळे संकट आणखीनच गंभीर झाले आहे.
71 देशांतील युनिसेफच्या आकडेवारीनुसार, निम्म्या लोकसंख्येकडे इंटरनेट सुविधा नाही. चारपैकी तीन देशांतील सरकारे टीव्ही माध्यमातून शिक्षण पुरवत आहे. ऑनलाईन शिक्षण देण्यात वीजेचा पुरवठा हाही मत्त्वाचा अडथळा आहे. 28 देशांचा अभ्यास केला असता असे दिसून आले की, गरीब जनतेतील फक्त 65 टक्के लोकांकडे वीज आहे.
मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट, वीज, कॉम्प्युटर, वायफाय इंटरनेट असा सुविधा दुर शिक्षण घेण्यासाठी गरजेच्या आहेत. मात्र, सर्व लोकांकडे या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोना संकटात घरात अडकून पडलेल्या कोट्यवधी विद्यार्थ्यांचे शिक्षण खोळंबले आहे. फक्त श्रीमंतांकडेच या सुविधा सहज उपलब्ध आहेत. मात्र, इतरांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला आहे.