लखनऊ - जेव्हा स्वातंत्र्यलढ्याचे वारे संपूर्ण देशामध्ये पसरले होते, तेव्हा गांधीजींच्या 'चले जाव' आंदोलनाला संपूर्ण देश समर्थन देत होता. त्या काळी, उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये एका २८ वर्षीय युवकाने, तरुणांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती व्हावी म्हणून स्वखर्चाने 'उमाशंकर प्रसाद विद्यालयाची' स्थापना केली. उमा शंकर प्रसाद हे तेव्हा, त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध दाखवलेल्या धाडसासाठी प्रसिद्ध होते.
१९२८ मध्ये, जेव्हा गांधीजी स्वातंत्र्यलढ्यासाठी संपूर्ण देशात यात्रा करत होते. यावेळी, महात्मा गांधींनी महाराजगंजला देखील भेट दिली. त्यावेळी उमाशंकर यांनी बापूंना, स्वातंत्र्यलढ्यासाठी मदत म्हणून १००१ चांदीची नाणी दिली होती.
हेही पहा : कंडेल सत्याग्रहासाठी महात्मा गांधींचा छत्तीसगड दौरा, ब्रिटीश सरकारची उडाली घाबरगुंडी
१९४२ मध्ये ब्रिटिश सरकारने उमाशंकर प्रसाद यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश दिला. कारण, ते स्वातंत्र्य सैनिकांना आर्थिक मदत करत होते. त्यानंतर, उमाशंकर यांनी भूमिगत होऊन आपले काम सुरु ठेवले. त्यामुळे, ब्रिटिश सैन्याने उमाशंकर प्रसाद विद्यालयाला आग लावली आणि त्यांच्या दुकानाची देखील लूट केली.
स्वातंत्र्यानंतर, उमाशंकर यांनी देशाकडून कोणतीही मदत घेण्यास नकार दिला. मिठाचा सत्याग्रह, असहकार चळवळ, चले जाव आंदोलन या सर्वांमधील त्यांचे योगदान हे न विसरण्यासारखे आहे. १९६२ आणि १९६७ साली त्यांनी विधानसभेमध्ये महाराजगंजचे प्रातिनिधित्व केले.
१५ ऑगस्ट १९८५ला उमाशंकर प्रसाद यांचे निधन झाले. मात्र आजही, महाराजगंजचे गांधी आणि मालवीय म्हणून ते लोकांच्या स्मरणात आहेत.
हेही पहा : गांधी १५० : स्वातंत्र्यलढ्यामध्ये बक्सरचे योगदान...