भोपाळ - शिवसेनेला काँग्रेसवरचं प्रेम महत्वाचे आहे की, सावरकरांचा आदर हे त्यांनी स्पष्ट करावे, असे वक्तव्य भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी केले आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात शुक्रवारी वाटण्यात आलेल्या पुस्तिकेवरून वाद पेटला आहे. त्यावरून भारती यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
भाजप नेहमीच सावरकरांच्या बाजूने उभी आहे. सावरकरांच्या विरोधात बोलणारी लोक हे देशाच्या विरोधात आहेत. देशामध्ये काँग्रेसचे अस्तित्वच उरले नाही. या प्रकारची पुस्तिका प्रकाशीत करून काँग्रेस पक्ष सर्वात खालच्या तळाला पोहोचला आहे, असे उमा भारती म्हणाल्या.
दरम्यान या प्रकरणी संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे. सावरकर महान होते आणि आहेत. त्यांची बदनामी करणारी भोपाळची ही घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशा शब्दात शिवसेनेने काँग्रेसला सुनावलं आहे.
यापूर्वी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारताला जगाची 'रेप कॅपिटल' म्हणजेच बलात्कारांची राजधानी म्हटले होते. त्यानंतर या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी होऊ लागली. मात्र राहुल गांधी यांनी मी माफी मागणार नाही माझं नाव राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. तेव्हा संजय राऊत यांनी ट्विट करुन वीर सावरकर यांचा अपमान शिवसेना सहन करणार नाही, असे म्हटलं होते. आता पुन्हा वीर सावरकर यांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.
काय प्रकरण?
भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलाचे प्रशिक्षण शिबीर पार पडले. त्यामध्ये एक पुस्तिका वाटण्यात आली होती. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यामध्ये समलैगिक संबंध असल्याचा उल्लेख केला आहे. या वक्तव्याचा भाजप नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला होता.