लंडन - वादग्रस्त इस्लाम प्रचारक झाकीर नाईकच्या 'पीस टीव्ही' या चॅनेलला द्वेषपूर्ण भाषणे आणि आक्षेपार्ह माहिती प्रसारित केल्याप्रकरणी ३ लाख पाऊंड इतका दंड ठोठावण्यात आला आहे. युकेमधील मीडिया वॉचडॉग 'ऑफकॉम'ने ही कारवाई केली आहे. प्रसारणाचे नियम मोडल्याचा पीस टीव्हीवर आरोप करण्यात आला आहे.
आमच्या संशोधनातून समोर आले आहे की, पीस टीव्ही आणि पीस टीव्ही उर्दू यांनी प्रसारित केलेली माहिती द्वेषपूर्ण आणि आक्षेपार्ह होती. या माहितीच्या माध्यमातून लोकांना गुन्हे करण्यास उद्युक्त केले जाऊ शकते, असे 'ऑफकॉम'ने सांगितले आहे. लॉर्ड प्रॉडक्शन्स लिमिटेड ही पीस टीव्हीची मालक कंपनी आहे, तर क्लब टीव्हीकडे पीस टीव्ही उर्दुचे लायसन्स आहे. याच्या पॅरेंट कंपनीचा मालक नाईक आहे, अशी माहिती आहे.
दुबईहून चालणाऱ्या पीस टीव्हीचे कामकाज इंग्रजी, बंगाली आणि उर्दू या भाषांमध्ये चालते. या चॅनेलचा फाऊंडर आणि मालक झाकीर नाईक आहेत. वादग्रस्त नाईकवर मनी लाँड्रिंगप्रकरणी भारतात गुन्हे दाखल आहेत. २०१६ साली नाईकने भारत सोडून मलेशियाचे नागरिकत्व मिळवले होते. तेंव्हापासून नाईक मलेशियातच वास्तव्यास आहे. गेल्या आठवड्यात भारताने मलेशियन सरकारकडे नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. वादग्रस्त व्यक्तिमत्त्वामुळे २०१०पासून नाईकला इंग्लंडमध्येही प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे.