नवी दिल्ली : येणाऱ्या जी-७ परिषदेला पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी युनायटेड किंगडमने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण दिले आहे. कॉर्नवेलमध्ये ११ ते १४ जूनपर्यंत ही परिषद असणार आहे. ब्रिटिश हाय कमिशनने रविवारी याबाबत माहिती दिली.
या परिषदेपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे एकदा भारत दौऱ्यावर येऊ शकतात, असेही कमिशनने सांगितले. जी-७ समूहामध्ये इटली, फ्रान्स, यूके, जपान, जर्मनी, कॅनडा आणि अमेरिका या देशांचा समावेश होतो.
भारत हे जगाचे औषधालय..
भारताला 'जगाचे औषधालय' असे म्हणत, कोरोना विषाणूवरील लसीच्या उत्पादनाबाबत ब्रिटनने देशाचे कौतुक केले आहे. भारत हा अगोदरपासूनच जगातील ५० टक्क्यांहून अधिक लसींचे उत्पादन करत आला आहे. महामारीच्या काळात ब्रिटन आणि भारताने एकत्रितरित्या भरपूर प्रमाणात काम केले आहे, असेही कमिशनने म्हटले.
दोन वर्षांमधील पहिलीच 'ऑफलाईन' परिषद..
यावर्षीच्या जी-७ परिषदेला ब्रिटनने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाच्या प्रमुखांनाही पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. जवळपास दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच जी-७ परिषद ही ऑनलाईन न होता, साध्या पद्धतीने होणार आहे. महामारीनंतर जगाने कशा प्रकारे उभारी घ्यावी, आणि भविष्यातील सर्वांसाठीच्या संधी याबाबत बोरिस जॉन्सन या परिषदेला संबोधित करतील. या परिषदेमध्ये कोरोना महामारीव्यतिरिक्त हवामान बदल, मुक्त व्यापार, तांत्रिक बदल आणि वैज्ञानिक संशोधनांबाबतही चर्चा होणार आहे.
हेही वाचा : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला जोडणाऱ्या ८ रेल्वे गाड्यांचे मोदींच्या हस्ते उद्घाटन