नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचे सुमारे अडीच लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 2020 च्या विविध विद्यापीठांच्या परीक्षा खोळंबल्या आहेत. कोरोनाचा प्रसार वेगाने होत असताना परीक्षा घेणे योग्य ठरेल की नाही, यावर मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा कधी घ्याव्यात यासंबंधी तज्ज्ञ समितीची स्थापन केली होती. तिच्या शिफारसी युजीसीने स्वीकारल्या आहेत.
विविध विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या शेवटी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी शिफारस तज्ज्ञ समितीने केली असून युजीसीने ही शिफारस स्वीकारली आहे. या प्रकरणी युजीसीने पत्रक जारी करुन माहिती दिली. युजीसीने याआधी 29 एप्रिलला नियमावली जारी केली होती. या नियमावलीनुसार आणि तज्ज्ञ समितीने जारी केलेल्या शिफारसीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांचे नियोजन करण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे. 6 जुलैला यूजीसीच्या बैठकीत तज्ज्ञ समितीच्या शिफारसी मान्य करण्यात आल्या.
कोरोनाचा प्रसार होत असताना आरोग्याची काळजी घेत परीक्षांची विश्वासार्हताही जपणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करियरच्या संधी साधत प्रगती करता येईल. अनेक विद्यापीठांच्या शैक्षणिक वर्ष 2020 च्या सहामाई किंवा वार्षीक परीक्षा खोळंबल्या आहेत. त्या सप्टेंबरच्या शेवटी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन करावे, अशी शिफारस आयोगाने स्विकाराली आहे, त्यामुळे परीक्षांसंबधी सुरु असलेल्या चर्चांना विराम लागला आहे.
नव्याने कॉलेज, विद्यापीठांत प्रवेश किंवा शैक्षणिक वर्षासंबधी इतर माहितीची गरज भासल्यास विद्यापीठ अनुदान आयोग नियमावली जारी करेल, असे आयोगाने म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्यात येतील, असा अंदाज बांधला जात होता. त्याला विराम मिळाला आहे. केंद्रीय मानसंसाधन मंत्री रमेश पोखरियाल यांनी युजीसीने शिफारस स्वीकारल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.