उदयगिरी (आंध्र प्रदेश) - लाकडी खेळणी म्हटलं की डोळ्यासमोर कोंडापल्लीचे नाव येते. मात्र, लाकडी खेळण्यांसोबतच इतर उपयोगी घरगुती वस्तूंची निर्मिती करत उदयगिरीने लाकडी कलाकृतींच्या व्यवसायात आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. येथल्या दिलावर भाई मार्ग येथे तयार करण्यात येणाऱ्या लाकडी कलाकृतींना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.
उदयगिरीच्या जंगलातील नर्दी, कालिवी, बिक्की आणि देवधारी या लाकडांपासून विविध आणि उत्तम वस्तूंची निर्मीती केली जाते. या कलाकृतींमध्ये प्लेट्स, हेअर क्लिप, खेळणी, चमचे, कांटेरी चमचे आणि ट्रेपर्यंतच्या सगळ्या वस्तू तयार केल्या जातात. तसेच, अगदी वाजवी किंमतीत या वस्तू आपल्याला बाजारात उपलब्ध होतात.
या कुटीर उद्योगाची सुरुवात शिल्पकार गुसिया बेगम यांनी केली. त्यांना या कलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. तर, आता या वंशपरंपरागत कलेला सातासमुद्रापार न्यायचे त्यांनी ठरवले आहे. गेल्या १५ वर्षांत गुसिया बेगम यांनी अनेक महिलांना या कलेचे प्रसिक्षण देऊन तयार केले. त्यामुळेच ही कला संरक्षित झाली. सोबतच कित्येकांना यापासून रोजगारदेखील मिळाला.
या ठिकाणी २०० पेक्षा जास्त सुरेख कलाकृतींना आकार देऊन जिवंत केल जाते. या कलाकृती पाहून पंतप्रधान मोदींनादेखील याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांनी दिल्लीच्या हुनर हाटमधील हस्तशिल्प उत्सवात दिलेल्या भेटीत तेथे ठेवण्यात आलेल्या लाकडी वस्तूंच्या निर्मिती प्रक्रियेबाबतही जाणून घेतले. या शिल्पकलेमुळे कित्येक महिला आज आपल्या पायावर उभ्या आहेत. लेपाक्षी आणि इतर खासगी संघटनांनी सहकार्य करत त्यांना डिजीटल तंत्रज्ञानाशी जोडले आणि यामुळेच त्यांच्या या कामाला गती प्राप्त झाली आहे.