श्रीनगर - पुलवामा येथील दलीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. तर या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाच्या एका जवानालाही वीरमरण आले असून २ जवान जखमी झाल्याचे समजते. त्यामुळे पुलवाम्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा येथील दलीपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती एसओजीच्या संयुक्त टीमला मिळाली होती. त्यानंतर आज पहाटे जवानांनी या भागाला घेरले. यानंतर या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्यूतर दिले आहे. या ठिकाणी अद्यापही चकमक सुरूच असल्याचे समजते.
गेल्या रविवारी काश्मीरमधील शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी ३ दहशतवादी ठार झाले होते. हे दोन्ही दहशतवादी लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते.