नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलन स्थळी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात एकाने आत्महत्या केली आहे. तर दुसऱ्या शेतकऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. आत्महत्त्या करणारा शेतकरी दरियाव सिंह हे जींदच्या सिंहवाला गावचे रहिवासी आहेत. हृदय विकाराच्या झटक्याने मरण पावलेले सुखमिंदर सिंह (वय 60 ) हे दुरकोट जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
दरियाव सिंह यांनी एका झाडाला प्लस्टिकच्या दोरीने गळफास लावत आत्महत्त्या केली आहे. सकाळी आंदोलक शेतकऱ्यांना त्याचा मृतदेह झाडाच्या फांदीला लटकलेला आढळून आला. घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील आढळली आहे. भारतीय किसान युनियन जिंदाबाद! हे मोदी सरकार चर्चेसाठी तारीखेवर तारीख देत आहे. हे काळे कायदे कधी रद्द होतील, याचा काहीच अंदाज नाहीये. जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होत नाहीत. तोवर आम्ही मागे हटणार नाही, असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहलंय. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेहाला फांदीवरुन खाली काढलं आणि पोस्टमार्टमसाठी सिव्हील हॉस्पिटलला पाठवला आहे.
शेतकरी आंदोलन -
प्रजास्ताक दिनी ट्रॅक्टर परेडला गालबोट लागल्यानंतर शेतकरी घराकडे निघाले होते. मात्र, शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज सीमेवर येऊ लागली आहे. ऑक्टोबरपर्यंत सरकारने कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीवर आंदोलक ठाम असून आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी देशव्यापी चक्का जाम करण्यात आला. तथिपी, शेतकरी आंदोलनाला अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी पाठिंबा दिला आहे. यात काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींचाही समावेश आहे.