गाझियाबाद (उत्तर प्रदेश) - सॅनिटायझर, दाढी करण्याचे क्रीम आणि नेल पॉलिश रिमूव्हर एकत्र करून प्यायलाने दोघांचा मृत्यू झाला. तर एकाला अत्यावस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मंगत राम शर्मा आणि क्रिष्ण पाली अशी मृतांची नावे आहेत.
ही घटना रविवारी रात्री बखरवा गावात घडली. या घटनेनंतर जिल्हा दंडाधिकारी अजय शंकर पांडे आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी या गावात सोमवारी सकाळी भेट दिली.
मृत मंगत राम याचा मुलगा कविंद्र शर्मा याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या वडिलांना दारू प्यायची सवय होती. मात्र, लॉकडाऊनमुळे दारू मिळत नव्हती. मृत पालीने नेल पॉलिश रिमूव्हर, दाढी करण्याचे क्रीम आणि सॅनिटायझर एकत्र केले. ते द्रव्य मंगत राम, पाली आणि विपीन या तिघांनी प्राशन केले. त्यानंतर या तिघांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मंगत राम आणि पालीला मृत घोषित केले. तर, विपीनवर उपचार सुरू आहेत.