मुजफ्फरपूर - बिहारमधील सोनपूर रेल्वे विभागात पूर्वांचल एक्सप्रेसचा अपघात झाला. समस्तीपूर जवळील सिलौत आणि सिहो स्टेशनच्या दरम्यान रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले. अपघातानंतर रेल्वेत गोंधळ उडाला. अपघातात २४ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. २० ऑक्टोबर म्हणजे आजपासूनच पूजा स्पेशल रेल्वे (05048) उत्तरप्रदेशातील गोरखपूरहून पश्चिम बंगालमधील कोलकाता शहराकडे निघाली होती. दरम्यान, बिहारमध्ये रेल्वे अपघातग्रस्त झाली. सिहो आणि सिलौत रेल्वे स्टेशन दरम्यान, रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले.
हेल्पलाईन नंबर जारी
अपघातानंतर समस्तीपूर रेल्वे विभागाने हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. नागरिकांनी माहितीसाठी आणि मदतीसाठी 06274232227 या क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.