जयपूर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये पंतप्रधान मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. तर अशा परस्थितीमध्ये काहीजण प्रशासनाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक घटना राजस्थानच्या भिवाडीतून समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भिवाडीतील दोन मुलांनी बिहारचे माजी खासदार उपेंद्र कुशवाहा यांना ट्वीटरवर मेसेज केला की, राजस्थानच्या भिवाडी शहरात ते 12 दिवसांपासून उपाशी आहेत. त्यांच्याकडे रेशन खरेदी करण्यासाठी पैसेही नाहीत. त्यानंतर उपेंद्र कुशवाह यांनी याची माहिती प्रशासनाला दिली. तेव्हा भिवाडी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना याची माहिती मिळताच त्यांनी संबंधित प्रशासनाकडे मदत साहित्य घेऊन जाण्याचे आवाहन केले.
त्यावेळी तिजारा तहसीलदार अरविंद काविया, भिवाडी डीएसपी हरिराम कुमावत आणि नगरपरिषद आयुक्त धर्मपाल मेसेज करणाऱ्यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी त्या ठिकाणी चक्क दारू पार्टी सुरू होती. तर अधिकाऱ्यांनी घराची झडती घेतली तेव्हा, घरामध्ये पुरेसे रेशन होते. त्यावरून असे दिसून आले की, या मुलांनी प्रशासनाला त्रास देण्यासाठी हा मेसेज केला होता. त्यामुळे प्रशासनाने या दोन जणांविरूद्ध पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.