अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी गुजरातमध्ये त्यांच्या स्वागतासाठी नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोतेरा स्टेडियमवर पार पडलेल्या या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्षांनी भारत व अमेरिका संबंध दृढ करण्यासाठी संरक्षण क्षेत्रासंदर्भात मोठी घोषणा केली. दोन्ही देशांमधील संरक्षण भागीदारी वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी तीन अब्ज अमेरिकी डॉलर्सची घोषणा केली. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
भाषणादरम्यान बोलताना, त्यांनी अमेरिकेचे भारतावर प्रेम असून दोन्ही देशांमध्ये विश्वासार्ह नातेसंबंध असल्याचे सांगितले. संरक्षण कराराबद्दल सकारात्मकता दाखवत त्यांनी द्विवपक्षीय नातेसंबंधावर विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या चहावाला ते पंतप्रधानपदाच्या प्रवासाचे कौतुक करत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान झाल्याबद्दल आभार मानले.
संरक्षण करार
भारत दौऱ्यावर आल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन बीलियन डॉलर्सचा संरक्षण करार केला आहे. यासाठी अमेरिका गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्यासाठी अमेरिका कटीबद्ध असून येणाऱ्या काळात अमेरिका भारताला जगातील आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिष्टमंडळाची २५ फेब्रुवारीला बैठक होणार आहे.
पाकिस्तानवर भाष्य
भारत आणि अमेरिका दोन्ही देश दहशतवाद आणि अतिरेकी विचारधारांविरोधात लढण्यासाठी कटिबद्ध असून अमेरिकेचे सरकार यासंबंधी पाकिस्तानशी चर्चा करत असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानसोबत देखील चांगले संबंध प्रस्थापित होत आहेत. यामुळे दक्षिण आशियाई देशांशी सामंजस्य वाढत असून याचा स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी उपयोग होणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.