नागौर - ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलाच्या धोक्यादरम्यान आज सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. आज लोक पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संकल्प करत आहेत. अशात राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील रोटू येथे पर्यावरण संरक्षणाची परंपरा गेल्या 550 वर्षांपासून सुरु आहे.
जिल्हा मुख्यालयापासून तब्बल 50 किलेमीटर अंतरावर रोटू गाव आहे. सांगितले जाते, की एका काळात या गावात आणि आसपासच्या भागात एकही झाड असे नव्हते ज्याच्या सावलीत बसता येऊ शकेल. ग्रामस्थांची ही अडचण दुर करण्यासाठी गावात आलेल्या गुरु जंभेश्वर महाराज यांनी 550 वर्षांपूर्वी एका रात्रीत खेजडी वृक्षाची 3 हजार 700 रोपे लावली आणि पर्यावरण संरक्षणाचे बीज रोवले. हीच परंपरा गावातील लोक कायम करत आहेत. विशेष म्हणजे तेव्हा लावले गेलेले हे वृक्ष आजही सुरक्षित आहेत.
झाडे कापण्यास बंदी -
या गावात झाडे कापणे तर लांबच त्याच्या फांद्या तोडण्यासही मनाई आहे. गावात एखादे नवे घर बांधायचे असेल आणि त्याजागी झाड असेल तर झाड न तोडता घराची जागा बदलावी लागते. गावातील रस्ते बनवतानादेखील या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले गेले.
गावात अनेक प्राणी करतात निवास -
झाडांसोबत या गावात जंगली प्राण्यांच्या सुरक्षेकडेही विशेष लक्ष दिले जाते. याच कारणामुळे गावातील शेतांमध्ये आणि घरांसमोर हरिण आणि इतर प्राणी सर्रास फिरताना दिसतात. गावात असलेल्या खेजडीच्या झाडांमुळे हे गाव इतर गावांच्या तुलनेत हिरवेगार दिसते.
महिला हरणांच्या पिल्लाला पाजतात दूध -
खेजडीची ही झाडे इतकी विशाल आणि घनदाट आहेत, की एका एका झाडावर शेकडो पक्षी राहतात. गावातील निसर्गरम्य वातावारणामुळे इथे अनेक प्राणी आणि पक्षी निवास करतात. इथल्या लोकांसोबत ते बागडतात. याच कारणामुळे यातील एखादे हरणाचे पिल्लू लहान वयातच काही कारणाने आईपासून दूर झाल्यास गावातील महिला त्याला दूध पाजून मोठे करतात.
प्रत्येक वर्षी 1 हजार नवी झाडे -
गावातील युवकांनी आता एक मोहिम सुरु केली आहे. येथील तरुण गावातील पडीक जमीनीवर झाडे लावून त्यांची काळजी घेतात. या तरुणांनी प्रत्येक वर्षी 1 हजार नवीन झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. यामुळे, गावातील हिरवळ दिवसेंदिवस वाढतच आहे.