नवी दिल्ली : भारत-चीन सीमावादाबाबत केवळ मुत्सद्दीपणेच उपाय शोधणे आवश्यक असल्याचे मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनावेळी ते बोलत होते.
लडाख आणि शेजारील प्रांतामधील, विशेषतः सीमेवरील आपली भूमिका कित्येक वर्षांपासून स्पष्ट आहे. या भागासंबंधी चीनसोबत आपण कित्येक करार केले आहेत. तसेच, याबाबत आपण कित्येक वेळा चर्चांमधून सामंजस्याने तोडगा काढला आहे. हे करार, सामंजस्याने काढलेले तोडगे - आणि त्यासंबंधीचे इतिहासात घेतले गेलेले निर्णय यांचा दोन्ही बाजूंनी पुन्हा विचार केला जाणे आवश्यक आहे. तेव्हा घेतलेले कित्येक निर्णय हे भविष्याचा विचार करुनच घेतले गेले होते, त्यामुळे या प्रश्नांवर मुत्सद्दीपणे उपाय शोधणे आवश्यक आहे. हा केवळ दोन देशांमधील प्रश्न नसून, याबाबत आपण कसा निर्णय घेतो याकडे जगाचे लक्ष आहे, असेही जयशंकर यावेळी म्हणाले.
सीमेवर जे काही होते त्याचा थेट परिणाम दोन्ही देशांमधील संबंधावर होतो. सध्याच्या काळात झालेल्या अनेक घटनांमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. माझ्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीची मला पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळेच मी हे म्हणत आहे, की या प्रश्नांना सोडवण्यासाठी चर्चेतून तोडगा शोधणे आवश्यक आहे, असे जयशंकर म्हणाले.
जयशंकर यांनी "दि इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर अॅन अनसर्टन वर्ल्ड" हे पुस्तक लिहिले आहे. याचा प्रकाशन सोहळा गुरुवारी ऑनलाईन पार पडला.
हेही वाचा : 'भारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम'ला पंतप्रधान मोदींनी केले संबोधित; म्हणाले...