श्रीनगर - पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताविरोधी हवाई मोर्चेबंदी करण्यासाठी चीनने पाकिस्तानला मदत केल्याचा एक अहवाल समोर आला आहे. लष्करातील चिनार कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि चीनदरम्यान कायमच शस्त्रपुरवठा केला जातो. मात्र, हवाई दलाच्या तळांसाठी चीनने पाकिस्तानला मदत केल्याची कोणतीही माहिती नसून तसे संकेत देखील मिळाले नसल्याचे सांगितले आहे.
मागील अनेक दिवसांपासून भारत आणि चीन सैन्यादरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन आता पाकिस्तानला मदत करत असल्याचे समोर आले आहे. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार चीन पाकिस्तानला हवाई दल सक्षम करण्यासाठी आणि हवाई हल्ले करण्यासाठी तळ उभारण्यासाठी मदत करत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, हे तळ पाकव्याप्त काश्मिरात उभारण्यात येत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
यासंदर्भात माहिती देताना लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू म्हणाले, चीन आणि पाकिस्तान एकमेकांना मदत करत असल्याचे वृत्त मी देखील माध्यमांमध्येच पाहिले आहे. मात्र, यासंदर्भातील कोणतेही अधिकृत संकेत किंवा माहिती आमच्यापर्यंत पोहचलेली नाही. मात्र, चीन कायमच पाकिस्तानला शस्त्रपुरवठा करत असतो, यात कोणतेही दुमत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरातील पौली पीरजवळील लसदन्ना ढोकजवळ हवाई तळांची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी चीनची पिपल्स लिब्रेशन आर्मी देखील पाकिस्तानला मदत करत आहे. यासोबतच पाकिस्तानी सैनिकांसह अनेक पाकिस्तानी लोक देखील हवाई दल निर्माण करण्याची मदत करत आहेत.
हेही वाचा - 'ही' कंपनी देशात ५.४८ लाख नोकऱ्या देण्याचे करणार नियोजन