नवी दिल्ली - देशात भाजपला ऐतिहासिक यश मिळाले आहे. भाजपने ३०३ तर रालोआने ३५०हून अधिक जागा जिंकल्या आहेत. आता भारताला एका चांगल्या आणि वैचारिकदृष्ट्या ठाम असलेल्या विरोधी पक्षाचीही गरज आहे. मात्र, सध्याचा विरोधी पक्ष आहे तो भ्रष्टाचारी, डरपोक आणि बिनडोक आहे अशी टीका भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. स्वामींनी भाजप विजयाचे 'त्सु'नमो'' असे नामकरण केले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'आपल्याला ठाऊक आहेच की काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेस पक्षातले दिग्गज नेतेही राहुल गांधी यांनाच या पराभवासाठी जबाबदार धरत आहेत. राहुल गांधींनी नकारात्मक प्रचार केल्यामुळेच काँग्रेस अपयश आले असा तक्रारीचा सूर आता काँग्रेसच्याच ज्येष्ठ नेत्यांनी काढला आहे,' असे स्वामी यांनी म्हटले आहे.
काय म्हटले आहे ट्विटमध्ये?
भाजपाचा अभूतपूर्व विजय झालेला आहे. अशात मला वाटते की, देशाला चांगल्या, स्वच्छ प्रतिमा असलेल्या, बुद्धीमान विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. यामुळेच लोकशाहीचा आदर राखला जाईल असे मला वाटते. मात्र, सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचाराने बरबटलेला, डरपोक आणि बिनडोक आहे, या आशयाचे ट्विट स्वामींनी केले आहे.