नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात नसल्याचे वक्तव्य नुकतेच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे तामिळनाडूतील भाजपच्या गोटात 2021 साली येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आशा निर्माण झाल्या आहेत. राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साह संचारला आहे.
तामिळानाडूत हातपाय पसरण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र, भाजप पक्ष आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात असल्याचे द्रविडीयन पक्षांकडून सांगण्यात येत आहे. आरक्षण आणि सामाजिक न्याय हे दोन मुद्दे तामिळनाडूत निवडणुक लढताना कायमच कळीचे ठरतात.
राज्यातील सत्ताधारी ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम, विरोधी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम, राज्यसभा खासदार वायको यांची मरुमलारची द्रवि़ड मुन्नेत्र कळघम, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, तामिनाडू काँग्रेस कमिटी, व्हीसीके पक्ष या सर्वांनी नुकतेच ओबीसींना वैद्यकीय शिक्षणात 50 टक्के आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्यघनेनुसार आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवत याचिका फेटाळून लावली.
त्यामुळे संभ्रम दुर करण्यासाठी भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे. सामाजिक न्यायाप्रती आमची बांधिलकी मजबूत आहे. आरक्षणावर आम्ही ठाम आहोत. मोदींनी याचा अनेकवेळा पुनरुच्चारही केला आहे. सामाजिक सौदार्ह आणि सर्वांना समान संधी मिळावी यासाठी आमचे प्रयत्न कायमच सुरु आहेत.
डीएमके पक्षाने जे. पी नड्डा यांचे वक्तव्याचे स्वागत केले आहे. जनता भाजपचे जवळून निरिक्षण करत आहे. भाजप आरक्षणाच्या विरोधात नसल्याचे जे. पी नड्डा यांनी मान्य केले आहे. जरी त्यांनी उशिरा हे वक्तव्य केले असले तरी मी त्यांचे आभार मानतो. नागरिकांचा रोष पत्करावा लागेल म्हणून कदाचित भाजप नेत्याने असे वक्तव्य केले असावे, असे स्टलिन यांनी म्हटले.
द्रविडीयन पक्ष आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या नावाखाली तमिळी नागरिकांची फसवणूक करत आहे. भाजप खरे तर आरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी लढत आहे. डीएमके आणि इतर पक्षांनी आम्हाला आरक्षणाच्या विरोधात असल्याचे लेबल लावले आहे. मात्र, आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आरक्षणाबाबतची बांधिलकी स्पष्ट केली आहे. स्टलिन यांनीही आमच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे, असे राज्यातील माजी भाजप खासदाराने सांगितले.