रांची - भगवान बिरसा जैविक उद्यान, म्हणजेच रांची प्राणी संग्रहालयात वाघिणीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणी संग्रहालय पाहायला आलेला एक व्यक्ती कुंपनावरून या वाघिणीच्या पिंजऱ्यात असणाऱ्या खड्ड्यात पडला. त्यानंतर, काही क्षणातच वाघिणीने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. वसिम अंसारी असे या युवकाचे नाव आहे. तो रांचीमधील खीजू टोका येथील रहिवासी होता, अशी माहिती समोर आली आहे.
प्राणीसंग्रहालयाचे अधिकारी आणि कर्मचारी याबाबतची माहिती मिळताच तातडीने त्याठिकाणी दाखल झाले होते. मात्र, त्याला वाचवण्यासाठी ते काही करतील याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. वाघिण त्याला मारून आपल्या पिंजऱ्याच्या आत घेऊन जात होती, हे पाहताच सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार केला. बंदूकीचा आवाज ऐकून वाघिणीने त्याला तिथेच टाकून दिले.
सध्या हा युवक पिंजऱ्यात कसा पडला, तो एकटा आला होता की त्याच्या सोबत आणखी कोणी होते याबाबत तपास सुरू आहे.
हेही वाचा : कोरोना विषाणूची दहशत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा खेळणार नाही होळी