जयपूर - राजस्थानात नदीच्या पुरामध्ये बुडाल्याने एकाच कुटुंबातील तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. मनिषा, निर्जला आणि पायल अशी मृत तरुणींची नावे आहेत. एका मुलीचा पाय घसरल्याने इतर दोघी वाचवण्यासाठी गेल्या असता, तिघीही पाण्यामध्ये बुडाल्या.
ही घटना जोधपूरमधील चोखा नयापूरा भागामध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघींचेही मृतदेह नदीच्या बाहेर काढण्यात आले.
ही घटना प्रेम प्रकरणातूनही झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, तिघीजणी शौचाला गेल्या असताना पाण्यात पाय घसरुन पडल्याने बुडाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. नदीतून पाणी काढत असताना एकीचा पाय घसरला असता, इतर दोघी तिला वाचवण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
पोलीस उपनिरिक्षक कैलाश दान याप्रकरणी तपास करत आहेत. मुलींच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला नसला तरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.