मोतिहारी - कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यानंतर देशातील वेगवेगळ्या भागात असणारे नागरिक आपल्या घरी परतण्यासाठी रस्त्यांवर उतरलेले दिसत आहेत. अशात भारताच्या शेजारीच असलेल्या नेपाळ सरकारनेदेखील लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ज्यामुळे नेपाळ आणि भारताची सीमा बंद केली गेली आहे.
नेपाळमध्ये कामानिमित्त गेलेल्या आणि हातावर पोट असणाऱ्या अनेक भारतीय नागरिकांनी आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, सीमा सील केली गेली असल्याने या सर्व कामगारांना भारत - नेपाळ सीमेवरील चंपारण जिल्ह्यातील रक्सौल बॉर्डर येथे थांबवण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांच्यासमोर राहणे आणि जेवण्याची सुविधा नसल्याने मोठी समस्या उभी ठाकली आहे.
हजारो भारतीय लोक याठिकाणी फसल्याची माहिती जिल्हाधिकारी शीर्षत कपिल अशोक आणि एसपी नवीन चंद्र जा यांना मिळाली. ज्यानतर त्यांनी रक्सौल येथे जाऊन याबद्दलचा आढावा घेतला. याशिवाय त्यांनी दुतावासाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चादेखील केली. या बैठकीनंतर डीएम शीर्षत कपिल अशोक यांनी सांगितले, की या कामगारांबद्दल केंद्रीय गृह मंत्रालय आणि विदेश मंत्रालयाला माहिती दिली गेली आहे. सरकारच्या आदेशानुसार याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.