पणजी- ग्रामीण भागातील अन्य समाजाच्या तुलनेत दलितांमध्ये शिक्षणाचा अधिक प्रसार झाला. ज्यामुळे त्यांच्यामध्ये परिवर्तन आले. हत्या, बलात्कार होत नसले तरीही अॅट्रॉसिटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असे मत अभ्यासक डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी मंगळवारी मडगाव येथे व्यक्त केले. 'हिंदूत्व अँड दलित' च्या दुसऱ्या आवृतीवर डूगीअर्स बुकशॉपने आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
सदर पुस्तक हे २००५ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाले होते. ज्याचे संपादन डॉ. तेलतुंबडे यांनी केले आहे. अलिकडेच त्याची दुसरी आवृती प्रकाशित झाली आहे. हे पुस्तक गोव्यात डूगीअर्स बुकशॉपने उपलब्ध केले आहे. त्यानिमित्ताने डॉ. तेलतुंबडे यांच्याकडून पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. तेलतुंबडे यांनी आपल्याला पुस्तकाची कल्पना कशी सूचली याचा प्रवास स्पष्ट करतांना ते म्हणाले, देशभरातील विविध राज्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दलितांविषयीचा दृष्टीकोन समजून घेण्याचा प्रयत्न करत जागृती निर्माण करण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. शिक्षणामुळे आता दलितांच्या राहणीमानात सुधारणा झाली आहे. तसेच राजकीय जाणीव तयार झाली आहे. तसेच आर्थिक स्थितीही बदलली आहे. अशावेळी अॅट्रॉसिटीच्या स्वरूपात बदल झाला आहे. ती वेगवेगळ्या प्रकारे दिसून येत आहे, असे डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी सांगितले.
त्याचबरोबर, हिंदूत्वामुळे जाती आधारित अॅट्रॉसिटी दिसत आहे. आरक्षणाच्या नावाने लोकांना दलितांविरोधात भडकविण्याचे प्रकार घडताना दिसतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अशी आकडेवारी प्रसिद्ध करत असते. परंतु, मागच्या आकडेवारीशी तुलना करणे कठीण असते, असे सांगून डॉ. तेलतुंबडे म्हणाले, २०१४ नंतर अशी माहिती मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे, दलितांनी विचार करावा, वेगवेगळ्या राज्यातील लोक हिंदूत्वाकडे कसे पाहतात यावर भर देण्यात आला आहे. हिंदूत्व वेगवेगळ्या स्वरूपात आहे. त्याची प्रक्रिया आणि दलितांवरील परिणाम यांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे डॉ. तेलतुंबडे यांनी सांगितले. तर, दलित चळवळीची विभागणी होण्याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही त्यांच्या काळाची निर्मिती होती. आता वेळ बदलली आहे. तसा अवकाशही बदलला आहे. त्यामुळे, दलित नवीन आंबेडकरांच्या शोधात असल्याने संघटनांमध्ये फाटाफूट मोठ्या प्रमाणात होताना दिसते. डॉ. आंबेडकर यांना समजून न घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात वैचारिक नुकसान झाले आहे. ते समजून घेतले पाहिजे असे मत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी लिओनार्द फर्नांडिस यांनी डॉ. तेलतुंबडे यांच्याशी संवाद साधला. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.
हेही वाचा- उमा भारतींनी केली मोदींची छत्रपतीशी तुलना, म्हणाल्या... ‘छत्रपती मोदी जिंदाबाद!’