नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याला जे लोक विरोध करत आहेत, ते दलित-विरोधी असल्याची टीका भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे. विरोधी पक्षाला यावरून लक्ष्य करत ते म्हटले की पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या निर्वासितांपैकी ७० टक्के लोक हे दलित आहेत.
बाहेरच्या देशांमध्ये धार्मिक अत्याचाराला बळी पडून भारतात आलेल्या शरणार्थींपैकी ७० ते ८० टक्के लोक हे दलित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलितांचे सर्वात मोठे कैवारी आहेत आणि जे नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत आहेत, ते दलित विरोधी आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. दिल्लीमधील एनएमडीसी येथे सीएए बाबत आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की काँग्रेस आणि विरोधी नेते हे देशाची दिशाभूल करत आहेत. ते देशाला नाही, तर केवळ मत मिळवण्याला प्राधान्य देतात. आम्ही कोणाचेही नागरिकत्व काढून घेत नाही. आपला देश हा धर्माच्या आधारावर विभागला गेला होता. काँग्रेस सरकारने आपल्या काळात कितीतरी चुका केल्या आहेत, मोदी सरकार त्यांना सुधारत आहे.
देशातील मुस्लीम लोकसंख्या ही ११ टक्क्यांवरून १४.५ टक्क्यांवर गेली आहे. तर हिंदू, जैन, शीख, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन लोकसंख्या ही २३ वरून केवळ ३ टक्के उरली आहे, असेही नड्डा म्हणाले. विरोधक विचारतात की आम्ही सीएएमध्ये मुस्लीमांना का घेत नाही? १९५० मध्ये भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र झाले. मात्र, त्याचवेळी पाकिस्तानने स्वतःला एक इस्लामिक देश म्हणून जाहीर केले. भारतात मुस्लीम हे अल्पसंख्यांक आहेत, तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये हिंदू, शीख, बौद्ध, पारसी आणि जैन हे अल्पसंख्यांक आहेत. त्यामुळे त्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. असे नड्डा यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : सोरेन यांचा मोठा निर्णय; 'या' कायद्याविरोधात निदर्शने केलेल्या आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे