दिल्ली - राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये दहा पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला. अशाप्रकारच्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव खराब होते आणि देशाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, दिल्लीची सुरक्षा गृहमंत्रालयाच्या ताब्यात आहे. त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे. दिल्लीत सातत्याने अशा घटना होत आहेत. अशा घटना कोणी घडवून आणत आहे, की हा योगायोग आहे हे पहावे लागेल. कोणत्याही शिक्षण संस्थेसाठी अशा घटना धोकादायक आहेत. यामुळे देशाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.
केंद्र सरकार सातत्याने जेएनयूला टार्गेट करत आहे. जेएनयूतील लिबरल थिंकिंगचा देशाला सार्थ अभिमान आहे. अनेक चांगली लोकं तिथून शिकून बाहेर पडली आहेत. अशा संस्थेला टार्गेट करणे हा दुर्दैवी प्रकार आहे. वेगवेगळ्या कारणाने देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत, हे देशाच्या ऐक्यासाठी आणि प्रगतीसाठी घातक असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.