हैदराबाद- पाकिस्तान सुरुवातीपासून त्यांच्या सैनिकांनी भारताच्या भूभागात घुसखोरी केल्याचा इन्कार करत होते. जिहादी अतिरेक्यांनी भारताच्या भूभागात प्रवेश केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे होते. मात्र, पाकचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ आणि लेफ्टनंट जनरल मोहम्मद अजीज खान यांच्यात टेलिफोनवर झालेल्या संभाषणामुळे पाकिस्तानचे कारगील बाबतचे पितळ उघडे पडले. यामुळे पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर आला.
तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ आणि लेफ्टनंट जनरल मोहम्मद अजीज खान यांच्यात टेलिफोनवर पहिले संभाषण 26 मे 1999 रोजी झाले. दुसरे संभाषण 29 मे 1999 रोजी झाले.
पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख मुशर्रफ चीन दौऱ्यावर होते. तर लेफ्टनंट जनरल मोहम्मद अजीज खान हे रावळपिंडी मध्ये होते. या दोघांच्या मध्ये संभाषण झाल्याची माहिती मिळाली. गुप्तचर यंत्रणांनी मिळवलेली संभाषणाची प्रत भारत सरकारने 11 जून 1999 या दिवशी प्रसिद्ध केली. यामुळे संपूर्ण जगाला पाकिस्तानचे इरादे समजले. टेलिफोन संभाषणाची टेप आणि प्रत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना सादर करण्यात आली होती.
परवेझ मुशर्रफ आणि मोहम्मद अजीज यांच्यात झालेल्या संभाषणामध्ये कारगिल मधील तत्कालीन स्थितीवर चर्चा करण्यात आली होती. याशिवाय दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री सरताज अजीज यांना भारत दौऱ्यावर पाठवणे, नवाज शरिफ यांच्याकडून कारगिल स्थितीबद्दल केल्या जाणाऱ्या हालचाली, वरिष्ठ सैन्य कमांडर आणि मुजाहिद्दीन यांची भूमिका यासंदर्भातील गोष्टी टेलिफोन संभाषणातून उघड झाल्या होत्या.
टेलिफोन संभाषणातून हे स्पष्ट झाले होते की पाकिस्तानी सैन्याच्या तुकड्या कारगिलवर ताबा मिळवण्यासाठी युद्ध करायला देखील तयार होत्या.