लखनऊ - चतरौली (ता. कर्नलगंज,जि. गोण्डा, उत्तर प्रदेश) येथील एका प्राथमिक शाळेने ९ वर्षांच्या विद्यार्थ्यांना चक्क चरित्रहीन असल्याचा दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे त्या मुलाला इतर कोणत्याही शाळेत प्रवेश मिळत नसल्याचे त्याचे भविष्य अंधकारमय झाले आहे.
येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मुलाचे त्याच्या वर्गमित्राशी सतत भांडण होत होते. त्यामुळे शिक्षकाने त्याला मारहाण केली. त्यानंतर मुलाच्या पालकाने मारहाण केलेल्या शिक्षकाविरोधात कारवाई करा, अशी मागणी मुख्याध्यापकाकडे केली. परंतु, मुख्याध्यापकाने यावर कसलीच कारवाई केली नाही.
त्यानंतर पालकाने कारवाई करा, अन्यथा आम्ही आमच्या मुलाला दुसऱ्या शाळेत पाठवू, असे सांगितले. त्यावर मुख्याध्यापकाने शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यावर हा मुलगा चरित्रहीन असल्याने त्याचे शाळेतून नाव कमी करण्यात येत आहे, असे कारण दिले. त्याचबरोबर विद्यार्थ्याची वागणुकही वाईट असल्याचे लिहून दाखला मुलांच्या पालकाकडे दिला.
त्यानंतर पालकांनी इतर शाळेत मुलाच्या प्रवेशासाठी धडपड केली. मात्र, मुलगा चरित्रहीन असल्याच्या शेरा दाखल्यावर असल्याने कोणतीच शाळा त्याला प्रवेश देत नाही, असे त्या मुलाच्या वडलांनी सांगितले.
यावर गोंडा जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.