कोल्लम (केरळ) - प्रत्येक माणसात एक कलाकार दडलेला असतो. काहीजण त्यांच्यातील कलेला जोपासतात, त्यात आपले करिअर करतात. तर, काहीजण नवीन मार्ग शोधतात. पण, आपल्या कार्यासह तेवढ्या जोमाने आवड जपणारे काही क्वचितच लोक आहेत. केरळच्या कोल्लम येथील पोलीस अधिकारी गुरुप्रसाद अय्यपनही त्यातील एक.
पोलीस अधिकाऱ्याची भूमिका चोखपणे बजावतनाच गुरुप्रसाद यांनी त्यांच्यातील कलेला जीवंत ठेवले. ते एक उत्कृष्ठ शिल्पकार आहेत. त्यांनी तयार केलेले अनेक शिल्प उत्तर केरळच्या कासरगोडपासून दक्षिणेतील कन्याकुमारीपर्यंत विविध ठिकाणी प्रस्थापित आहेत. त्यांनी त्यांच्या कलाकृतींसाठी तीन ललितकला अकादमी पुरस्कारही जिंकले आहेत. यासह २०१७ मध्ये चोखपणे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री पोलीस पदकही देण्यात आले.
कलेच्या क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ कठोर परिश्रम घेत गुरुप्रसाद यांनी शिल्पकलेची एक स्वतंत्र शैली आणि कलाकुसरीचं तंत्र विकसित केले आहे. ज्याला चतुरा शिल्पकला रिती’ असे म्हटले जाते. केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील कोट्टरक्करा या ठिकाणी त्यांनी शंकराची ४४ फूट उंच मूर्ती त्यांनी घडवली आहे. ही मूर्ती पाहिल्यानंतर त्यांची या कलेप्रती असलेली आवड आणि त्यासाठीच्या समर्पणाची प्रचिती येते.
आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी ललितकलेत पदवी प्राप्त केली. त्यानंतर केरळ विद्यापीठातून मूर्तिकलेचे व्यावसायिक प्रशिक्षणही घेतले. मात्र, यातून पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नाही, असं लक्षात येताच आणि त्यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली. आज त्यांना केरळ पोलिसात रुजू होऊन २२ वर्षे झालीत. त्यांचे कार्यक्षेत्र बदलले मात्र, त्यांनी आपली आवड आजही पूर्वीसारखीच जोपासली आहे.
मूर्तीकलेचं शिक्षण त्यांनी एमसी शेखर यांच्याकडून घेतले. एमसी शेखर हे विश्वप्रसिद्ध शिल्पकार आणि आधुनिक भारतीय शिल्पकलेच्या प्रणेत्यांपैकी एक असलेल्या देवीप्रसाद रॉय चौधरी यांचे शिष्य राहिलेत. ते कामात कितीही व्यग्र असले तरी वेळात वेळ काढून वर्षातून एकदा शिल्पकलेचं प्रदर्शन न विसरता भरवतात. यासाठी त्यांचे कुटुंबीय त्यांना पूर्ण सहकार्य करते. कार्यक्षेत्र कुठलंही असो माणसातील कला जागृत असली तर तो कुठल्याही परिस्थितीत त्याची कला उत्कृष्ठपणे सादर करू शकतो असे गुरुप्रसाद आपल्या अनुभवातून सांगतात.