हैदराबाद - काँग्रेसने उमेदवारी देण्यासाठी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांची मागणी केली, असा आरोप नुकतेच पक्ष सोडलेल्या तेलंगणा काँग्रेसचे नेते पी. सुधाकर रेड्डी यांनी केला आहे. रेड्डींच्या या आरोपामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. रेड्डी यांनी आजच काँग्रेसला राम-राम ठोकला होता. ते भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पी. सुधाकर रेड्डी यांनी आजच तेलंगणा काँग्रेस समितीच्या सचिव पदावरुन राजीनामा दिला आहे. त्यानंतर काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन त्यांनी काँग्रेसवर लाच घेतल्याचा मोठा आरोप केला. पक्षाने आपले मुल्य विसरून निवडणुकांमध्ये उमेदवारांना तिकीट देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी करत आहे, असा आरोप सुधाकर रेड्डी यांनी केला आहे.
काँग्रेसने तिकीट देण्यासाठी पैशांची मागणी केल्यामुळे आपल्याला धक्का बसला आणि त्यासाठीच पक्षाच्या सचिव पदाचा त्याग केला, असे कारण सुधाकर रेड्डी यांनी सांगितले आहे. त्यांनी पक्षामध्ये होत असलेल्या हा गैरप्रकार इतर नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून काहीच फायदा झाला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
तिकीट वितरण करण्यासाठी मी मध्यस्थ असल्यामुळे माझ्या मनाला ते पटत नव्हते. यामुळे मी आतून दुःखी झालो होतो. तसेच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या अशा वागणूकीमुळे मी त्रस्त होऊन पक्ष सोडला, असेही सुधाकरण यांनी म्हटले आहे.