नवी दिल्ली - इटलीमधील भारतीय विद्यार्थ्यांचे स्वॅब नमुने गोळा करण्यासाठी भारतातील डॉक्टरांचे एक पथक इटलीला रवाना होणार आहे. तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले.
चार डॉक्टरांच्या या पथकामध्ये दोन मायक्रोबायोलॉजिस्ट आणि दोन नागरी आरोग्य विशेषज्ञांचा समावेश असणार आहे. राम मनोहर लोहिया रुग्णालय आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रामधील हे चार डॉक्टर असणार आहेत. गुरूवारी रात्री ते रोमला रवाना होतील.
इटलीमधील भारतीय दूतावासाने तेथील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून, त्यांना एका विशिष्ट ठिकाणी येण्यास सांगितले आहे, जिथे त्यांचे नमुने गोळा केले जातील. सध्या इटलीमध्ये ३००हून अधिक भारतीय विद्यार्थी आहेत.
यासोबतच, इराणमधून गोळा करण्यात आलेल्या १०८ नमुन्यांची एआयआयएमएस प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. कोरोनामुळे चीनबाहेर सर्वाधिक बळी इराणमध्ये गेले आहेत. सध्या इराणमध्ये एक हजारांहून अधिक भारतीय नागरिक अडकले असून, त्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. या भारतीयांमध्ये विद्यार्थी, मासोमार आणि भाविकांचा समावेश आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे सहा वैज्ञानिक हे सध्या इराणमध्ये आहेत. त्यांनी आतापर्यंत ४००हून अधिक भारतीयांचे स्वॅब नमुने गोळा केल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना तिथे प्रयोगशाळा उभारता यावी यासाठी आवश्यक ती साधने पाठवण्यात आली आहेत.
कोरोनाग्रस्त देशांमधून भारताने आतापर्यंत ९४८ नागरिकांना 'एअरलिफ्ट' केले आहे. यामद्ये ९०० भारतीयांचा समावेश आहे. तर बाकी ४८ मध्ये मालदीव, म्यानमार, बांगलादेश, चीन, अमेरिका, मादागास्कर, श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरू या देशांमधील नागरिकांचा समावेश आहे.
हेही वाचा : कोरोनाचा हाहाकार : इराणमध्ये एका दिवसात ६३ जणांचा मृत्यू, एकूण बळींची संख्या ३५४ वर..