मुंबई - थोर भारतीय तत्वज्ञ, विद्वान आणि राजकारणी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज १३२वी जयंती आहे. त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. राधाकृष्णन यांनी १९०९ ते १९४८ पर्यंत शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रांतातील तिरुत्तानी येथे झाला. त्यांच्या तत्वज्ञानाचा आणि उपदेशाचा जगभरात मोठा परिणाम झाला.
राधाकृष्णन यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरस्वामी होते, जे महसूल अधिकारी होते. त्यांच्या आईचे नाव सर्वपल्ली सीता होते. वयाच्या सोळाव्या वर्षी राधाकृष्णन यांचा विवाह सिवकामू यांच्याशी झाला. १९५८ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. राधाकृष्णन यांना पाच मुली आणि एक मुलगा अशी सहा मुले झाली. राधाकृष्णन यांनी मद्रास विद्यापीठातून तत्वज्ञानात मास्टर्स केले. त्यांनतर ते म्हैसूर विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठात शिकवत असत, जेथे ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते.
शिक्षक दिनाचा इतिहास -
राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाचा भार स्वीकारल्यानंतर, १९६२ मध्ये पहिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि राजेंद्र प्रसाद यांच्यानंतर ते देशाचे दुसरे राष्ट्रपती बनले. राधाकृष्णन यांनी जेव्हा राष्ट्रपती पदाचा भार स्वीकारला, तेव्हा त्यांच्या विद्यार्ध्यांनी त्यांचा वाढदिवस 'राधाकृष्णन दिन' म्हणून साजरा करावा, अशी विनंती केली. मात्र, राधाकृष्णन यांनी ते नाकारले. असा दिवस साजरा करण्यापेक्षा ५ सप्टेंबर हा दिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात यावा असे त्यांनी सुचवले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी माहिती -
- पदव्या - राधाकृष्णन यांनी एम.ए., डी.लिट, एल.एल.डी., डी.सी.एल, लिट.डी., डी.एल., एफ.आर.एस.एल., एफ.बी.ए. अशा अनेक पदव्या मिळवल्या. ते ऑल सोल्स कॉलेजचे (ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी) मानद फेलो होते.
- रवींद्रनाथ टागोर यांचे तत्वज्ञान (१९१७) या पुस्तकातून त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान जगाच्या डोळ्यासमोर आणले. त्यांनी चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेज आणि कलकत्ता विद्यापीठात अध्यापन केले.
- राधाकृष्णन यांनी म्हैसूर (१९१८-२१) आणि कलकत्ता (१९२१-२१, १९३७-४१) विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. तसेच ते आंध्र विद्यापीठाचे (१९३१-३६) कुलगुरू होते.
- राधाकृष्णन हे इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठात (१९३६-५२) पूर्व धर्मांचे आणि नीतिशास्त्रांचे प्राध्यापक आणि भारतातील बनारस हिंदू विद्यापीठाचे (१९३९-४८) कुलगुरू होते.
- युनेस्कोमध्ये (१९४६-५२) राधाकृष्णन यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आणि १९४९-५२ पर्यंत यूएसएसआरमध्ये भारतीय राजदूत होते.
- १९५३-१९६२ पर्यंत राधाकृष्णन हे दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते.
- राधाकृष्णन यांना साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी १६ वेळा आणि नोबेल शांततेसाठी ११ वेळा नामांकन देण्यात आले.
- १९५७च्या दुसर्या सार्वत्रिक निवडणुकीत राधाकृष्णन हे पुन्हा उपराष्ट्रपती झाले. उत्कृष्ट कार्य कर्तृत्त्वामुळे त्यांना १९५८ साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.
- आंध्रराज्यातील तिरूपती या गावी २४ एप्रिल १९७५ रोजी वृद्धापकाळाने राधाकृष्णन यांचे निधन झाले.
शिक्षकांसंबंधी प्रेरणादायी विचार-
"जर एखादा देश भ्रष्टाचारमुक्त व्हायचा असेल आणि सुंदर मनांचा देश होत असेल तर मला असे वाटते की समाजात असे तीन मुख्य सदस्य आहेत जे बदल घडवून आणतील. ते वडील, आई आणि शिक्षक आहेत."- डॉ एपीजे अब्दुल कलाम
''सामान्य शिक्षक फक्त सांगतो. चांगला शिक्षक स्पष्टीकरण देतो. श्रेष्ठ शिक्षक दाखवून देतो. महान शिक्षक प्रेरणा देतो."- विल्यम आर्थर वार्ड
''शिक्षण हे माणसामध्ये आधीपासूनच परिपूर्णतेचे प्रदर्शन आहे.''- स्वामी विवेकानंद
''तंत्रज्ञान हे एक साधन आहे. मुलांना एकत्रितपणे काम करण्यासाठी आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी, शिक्षक सर्वात महत्वाचे आहेत.''- बिल गेट्स
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार -
- ज्ञान आपल्याला शक्ती देते, प्रेम आपल्याला परिपूर्णता देते.
- पुस्तक हे असे माध्यम आहे, ज्याद्वारे आपण संस्कृतींमध्ये बांध बांधतो.
- आनंद आणि आनंदी जीवन केवळ ज्ञान आणि विज्ञानाच्या आधारे शक्य आहे.
- जेव्हा आपल्याला वाटते, की आपल्याला माहित आहे तेव्हा आपण शिकणे थांबवतो.
कोरोनाचा अध्यापन क्षेत्रावर प्रभाव -
कोरोनाने अध्यापन क्षेत्रावरही नांगर फिरवला आहे. या संकटात अनेक शिक्षक त्यांच्या गावी जाऊ शकतात, अथवा शाळा दीर्घकाळ बंद असल्यास दुसरे काम शोधू शकतात. उदाहरणार्थ, सिएरा लिओन आणि लाइबेरियाला २०००च्या दशकाच्या सुरुवातीला आणि इबोला संकटानंतर शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी संकटांचा सामना करावा लागला होता.
ऑनलाइन शिक्षणाविषयी शिक्षक तांत्रिक अडचणींबद्दल शंका व्यक्त करत आहेत. हा प्रकार विद्यार्थ्यांद्वारे स्वीकारला जाईल की नाही याबद्दल ते चिंता व्यक्त करत आहेत. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे केले जाईल, याविषयी त्यांनी शंका व्यक्त केली आहे.
शिक्षकांसाठी ऑनलाइन शिक्षणासाठी असलेले आव्हान म्हणजे मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालकांशी वारंवार संवाद साधणे आणि विद्यार्थ्यांना तांत्रिक बाबी माहित असणे. ऑनलाइन शिक्षणास प्रवृत्त करण्यासाठी, शिक्षकांनी तंत्रज्ञानामधील त्यांचे ज्ञान आणि कौशल्याची पातळी वाढवणे आवश्यक आहे.
शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार -
शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याचे उद्दीष्ट म्हणजे देशातील काही उत्कृष्ट शिक्षकांच्या योगदानाचा आनंद साजरा करणे. ज्या शिक्षकांनी त्यांच्या वचनबद्धतेने आणि उद्योगाद्वारे शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याबरोबर विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले आहे, अशा शिक्षकांचा या पुरस्काराद्वारे सन्मान केला जातो.