काबूल - ईदच्या निमित्ताने अफगाणिस्तान सरकारमधील अटक कैद्यांना मुक्त करणार असल्याचे तालिबानने जाहीर केले आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. अमेरिका-तालिबान शांतता करारानुसार दोन्ही पक्षांनी कैद्यांची सुटका करण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार आता कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अफगाणिस्तान सरकारनेही दोहा करारानुसार 5 हजार कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच ईदनंतर चर्चा सुरू करण्यात यावी, असे तालिबानच्या कतारमधील प्रवक्त्याने सांगितले. अमेरिका-तालिबान शांतता करारानुसार अफगाणिस्तान सरकार 5 हजार कैद्यांची सुटका करेल, तर तालिबान 1 हजार कैद्यांची सुटका करेल, असे मान्य करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत अफगाणिस्तान सरकारने 4 हजार 400 पेक्षा जास्त कैद्यांची सुटका केली आहे, तर तालिबानने 800 अफगाण अधिकारी आणि सैनिकांना मुक्त केले आहे.
तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये विश्वासार्हता वाढविण्यासाठी कैद्यांना सोडण्याची तरतुद दोहा करारात आहे. तसेच ईद आणि चर्चेच्या निमित्ताने तालिबानने तीन दिवसांसाठी शस्त्रसंधी जाहीर केली आहे. अफगाणी सैन्यावर हल्ले न करण्याचे तालिबानने जाहीर केले आहे. जून 2019 नंतर तिसऱ्यांदा शस्त्रसंधी झाली आहे.