नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीसह त्याच्या बहिणीचेही स्विस बँकेतील ४ खाती गोठवण्यात आली आहेत. स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेताना या ४ खात्यातून कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यास प्रतिबंध घातला आहे.
भारतात नीरव मोदीविरोधात सुरू असलेल्या घोटाळ्याच्या चौकशीच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नीरव मोदी आणि त्याच्या बहिणीच्या ४ खात्यात सध्या २८३ कोटी १६ लाख इतकी रक्कम आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने स्विस अधिकाऱ्यांसोबत पीएमएलए अधिनियमाअंतर्गत खाती गोठवण्याची विनंती केली होती. नीरव मोदीने भारतातील बँकेत घोटाळे करुन ही रक्कम स्विस बँकेत जमा केली आहे. त्यामुळे त्याची खाती गोठवण्यात यावीत, अशी विनंती ईडीने स्विस बँकेच्या अधिकाऱ्यांकडे केली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदीच्या खात्यात ३ कोटी ७४ लाख ११ हजार ५९६ डॉलर जमा आहेत. तर, बहिण पूर्वी मोदीच्या खात्यात २७ लाख ३८ हजार १३६ पौंड जमा आहेत. पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर ईडी आणि सीबीआयमार्फत तपास सुरू आहे. गेल्यावर्षी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात मुख्य आरोपी नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि नीरवची बहिण पूर्वी मोदीचे नावही सामिल करण्यात आले होते.
नीरव मोदीने स्विस बँकेतील खाती गोठवल्यानंतर ट्विट केले आहे, की माझी स्विस बँकेतील खातीही कितीही गोठवली तरी काही फरक पडत नाही. मी आधीच सर्व खाती रिकामी केली आहेत. परंतु, माझ्या बहिणीच्या खात्यासोबत छेडछाड कशाला करता? मोदीजी ही तुमची लाडली योजना बेटी बचाव बेटी पढाव?